कोल्हापुरात जनसुराज्यच्या'या'उमेदवारावर जीवघेणा हल्ला , हल्ल्यामागे नेमकं कोण ?
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. प्रचारातून परतत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संताजी घोरपडे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या मानवाड येथे रविवारी रात्री संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाला. मानवाड येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी संताजी घोरपडे गेले होते तेथून परतत असताना मानवाडलगत रस्त्याशेजारी पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली.गाडी अडवणारे आपले कार्यकर्तेच असावेत असा संताजी घोरपडे यांचा समज झाला. कार्यकर्त्यांना काही अडचण आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी गाडी बाजूला घेतली. गाडीतून उतरले असता घोरपडे यांच्यावर काठी आणि धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. तेथून पळत असताना त्यांनी दगडफेकी केली. या दगडफेकीत गाडीचही नुकसान झालं.
संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर संताजी घोरपडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संताजी घोरपडे यांच्या तक्रारीनुसार सहा अज्ञातांविरुद्ध कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागं नेमकं कोण याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.