कोल्हापूरात रंगणार पोलीस क्रीडा स्पर्धा

कोल्हापूरात रंगणार पोलीस क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील परिक्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ आयोजित करण्याचा मान क्रीडा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. या स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे रंगणार आहेत.

स्पर्धेतील सहभाग:

सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, आणि कोल्हापूर या सहा घटकांचे संघ स्पर्धेत भाग घेणार आहेत. सुमारे १२०० पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवतील.

उद्घाटन आणि समारोप:

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांच्या हस्ते होईल. समारोप व बक्षीस वितरण समारंभ ४ डिसेंबर रोजी सायंकाळी पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेचा उद्देश:

पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरील ताण कमी करणे, त्यांना विरंगुळा देणे, तसेच सांघिक भावना आणि खेळाडूवृत्ती विकसित करण्याच्या हेतूने दरवर्षी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

खेळांच्या प्रकारांमध्ये समावेश:

अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॅन्डबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, जलतरण, कुस्ती, ज्युदो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कबड्डी, खो-खो, वुशु अशा विविध खेळांमध्ये स्पर्धा होणार आहेत.

विशेष आकर्षण:

२ डिसेंबर रोजी सकाळी पत्रकार व पोलीस अधिकारी यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना रंगणार आहे.

स्पर्धेचे बोधचिन्ह:

या सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या "गवा" या प्राण्याला बोधचिन्ह म्हणून निवडले गेले आहे.

स्पर्धेचे ठिकाण:

सामने पोलीस मुख्यालय कोल्हापूर, छत्रपती शिवाजी विद्यापीठ, शहाजी लॉ कॉलेज, आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या ठिकाणी खेळवले जाणार आहेत.

कोल्हापूर परिक्षेत्रातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.