केआयटीच्यावतीने विद्यार्थ्याना सकारात्मक उर्जा देणाऱ्या अभिग्यानचे आयोजन

केआयटीच्यावतीने विद्यार्थ्याना सकारात्मक उर्जा देणाऱ्या अभिग्यानचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने ‘अभिग्यान’ या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन गेली ११ वर्षे करण्यात येत आहे. वॉक विथ द वर्ल्ड या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने याचे नियोजन करण्यात येते. आजवर खऱ्या अर्थाने युथ आयकॉन असणाऱ्या देशातील,परदेशातील मान्यवर,उद्योजक,पत्रकार, समाजसेवक, संशोधक, कलाकार, लेखक, कवी,प्रशासकीय अधिकारी,अभियंते अशा अनेक लोकांना कोल्हापूरात आमंत्रित केले गेले आहे.गेल्या ११ वर्षात किमान ११००० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत अशी माहिती अभिग्यान मुख्य समन्वयक प्रा.अमर टिकोळे यांनी दिली.

यावर्षी या १२ व्या ‘अभिग्यान’ चे आयोजन रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी व्हिक्टोरिया बँक्वेट, हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते ५ या वेळेत संपन्न होणार आहे.

‘अभिग्यान’ मध्ये यावर्षीही वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे काम करणाऱ्या व खऱ्या अर्थाने तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातील सुप्रसिद्ध पाणी व पर्यावरण संरक्षक राजेंद्र सिंग, सुप्रसिद्ध जेष्ठ वकील उज्वल निकम, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कॉटन किंग या नामांकित ब्रँडचे संचालक  कौशिक मराठे, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व नाट्य क्षेत्रातील लेखक व दिग्दर्शक  क्षितिज पटवर्धन,टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेते  अभिजीत खांडकेकर हे यावर्षीचे सन्माननीय पाहुणे असणार आहेत अशी माहिती संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली. अभिग्यान-२४ च्या नियोजनात संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे मोठे प्रोत्साहन लाभले असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली.

८०० विद्यार्थ्यांचा व प्रोफेशनलचा सहभाग या कार्यक्रमासाठी निश्चित झाला असून पुढील एक-दोन दिवसात १००० चा टप्पा पूर्ण होईल अशी आयोजकांना खात्री आहे. सहभागी सर्वांसाठी अल्पोपाहार, भोजनाची व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहेत.अशी माहिती अधिष्ठाता,विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट यांनी दिली.आभार प्रदर्शन शार्दुल सपकाळ यांनी केले. या पत्रकार परिषदेसाठी सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव,विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा कमलाकर,अथर्व वैद्य आदि उपस्थित होते.