दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य नाही : विनाअनुदानित शाळा कृती समिती

दहावी, बारावी परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य नाही : विनाअनुदानित शाळा कृती समिती

कोल्हापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शक्य नाही. विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर यांनी याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर बोर्ड सहसचिव डी.एम. किल्लेदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,प्रत्येक केंद्रावर कमीत कमी १० वर्ग व जास्तीत जास्त ५० वर्ग असू शकतात. एवढ्या सर्व ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे अजिबात शक्य नाही.यासाठी येणारा खर्च कोण देणार? केंद्र संचालक हे त्या शाळेतील किंवा बाहेरच्या शाळेतील असतील तर संबंधित संस्थेला ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सांगू शकत नाहीत. पूर्वीप्रमाणे वेतनेतर अनुदान मिळत नसल्यामुळे कोणतीही संस्था यासाठी तयार होणार नाही. यासाठी येणारा खर्च विभागीय मंडळाच्या माध्यमातून दिल्यास आम्ही सर्व ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून घेऊ.जसे कॉपीमुक्त परीक्षा घेणे आमच्या सर्वांचे कर्तव्यच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भयमुक्त व तणावमुक्त परीक्षा देणे यासाठी सुद्धा विचार होणे आवश्यक आहे.

यावेळी एस.यु .म्हस्कर, खंडेराव जगदाळे ,पुंडलिक रहाटे,रोहिणी खाडीलकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.