कोल्हापूर कत्तलखाना प्रकरणात डॉ. विजय पाटील दोषमुक्त

कोल्हापूर कत्तलखाना प्रकरणात डॉ. विजय पाटील दोषमुक्त

पुणे (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बापट कॅम्प येथील कत्तलखान्याच्या देखरेखीची जबाबदारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्याकडे आहे. अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर यांच्या वतीने कत्तलखान्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने त्या त्रुटींची पूर्तता केली.

या त्रुटींची पूर्तता करताना डॉ. पाटील यांनी स्वतःचे कव्हरींग लेटर आणि कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे प्रशासनाकडे सादर केली होती. मात्र, या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत जयराज कोळी यांनी शंका उपस्थित करत, ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा आरोप करून डॉ. विजय पाटील यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुण्यातील मा. सहआयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे फौजदारी कारवाईसाठी अर्ज दाखल केला होता.

या सुनावणीदरम्यान, डॉ. विजय पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. समीर तांबेकर यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून सहआयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी यांनी अंतिम निर्णय दिला. निर्णयानुसार, डॉ. विजय पाटील यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध न झाल्याचे स्पष्ट करत, त्यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त करण्यात आले आहे.

या निकालामध्ये अ‍ॅड. समीर तांबेकर यांचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा विचार करण्यात आला होता.