तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मिळाले १६ लाखांचे अनुदान

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे जलयुक्त शिवार अंतर्गत गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेतून ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याचे काम केलेल्या जेसीबी मालकांना अनुदानाच्या आणि शेतकऱ्यांना १६ लाखांचे अनुदान मिळाले असून या रकमेचा धनादेश शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
दोन वर्षापूर्वी कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावातील गाळ काढणेचे काम केले होते. राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या या कामामुळे तब्बल आठ हजार ट्रॉल्या गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यात आला होता. शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मिळणारे अनुदानही राजे फौंडेशनच्या पुढाकारातून त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे घाटगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जेसीबी मालक व शेतकऱ्यांना दोन वर्षे प्रलंबित असलेली १६ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली.
दोन वर्षापूर्वी ऐन उन्हाळ्यात तलावातील पाण्याने तळ गाठला होता. पाणी साठवणूक क्षेत्र कोरडे पडले होते.तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठ्यावर परिणाम होऊन पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते. या संकटातही तलावातील गाळ काढण्यासाठी समरजितसिंह घाटगेंनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात सर्वप्रथम गाळ काढण्याचे काम झाले होते.
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढली. शिवाय शेतकऱ्यांना जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असा दुहेरी फायदा या उपक्रमामुळे झाला. सामाजिक बांधिलकीच्या जबाबदारीतून यासाठी यशस्वीपणे पाठपुरावा केल्याबद्दल शेतकरी,वाहनधारक व नागरिकांनी घाटगे यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राजे बँकेचे संचालक अरुण गुरव, सुशांत कालेकर ,माजी संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.