कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, आ. जयश्री जाधव यांचे आंदोलन

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, आ. जयश्री जाधव यांचे आंदोलन
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केलं. 

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी माझे पती व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे आग्रही होते. त्यांच्या माघारी पोटनिवडणुकीतील विजयानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. यासाठी अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही शासन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आमदार जाधव यांनी संताप व्यक्त केला.


गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडलीय. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्यानं, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येताहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटलाय. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलनं केलीत. परंतु शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या प्रश्नावर मी वारंवार आवाज उठवलाय. मात्र, त्याकडेही शासन दुर्लक्ष करीत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.