शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे: डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर : विज्ञानाच्या बळावर जागतिक प्रगतीची स्वप्ने पाहात असताना शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आजपासून राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताहाला प्रारंभ झाला. याचा उद्घाटन समारंभ रसायनशास्त्र अधिविभाग सभागृहात सकाळी झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) वैज्ञानिक डॉ. अशोक गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांनी नाविन्यपूर्ण संशोधनाबरोबरच त्याचे उपयोजन आणि त्यावरील स्वामित्वहक्क या अनुषंगाने पावले उचलली आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आजपर्यंत दोन हजारांहून अधिक कंपन्या स्थापन केल्या आहेत. आपल्याला सुद्धा आता काळाची पावले ओळखून हा मार्ग चोखाळावा लागणार आहे. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांनी आता कंपन्या स्थापन करण्यास प्राधान्य द्यायला हवे. या माध्यमातून वैज्ञानिक प्रगती साधत असतानाच शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाची कास मात्र सोडता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. अशोक गिरी यांनी जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची मानली जाणारी हम्बोल्ट फेलोशीप मिळविण्यासाठी कशा प्रकारे संशोधनाची दिशा राखली पाहिजे, या दृष्टीने शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना मोफत मार्गदर्शन करण्याचा मनोदय व्यक्त केला.
रसायनशास्त्र अधिविभाग प्रमख डॉ. कैलास सोनवणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. क्रांती मोरे यांनी आभार मानले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी डॉ. डी.एच. दगडे, डॉ. पोरे, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. तायडे, डॉ. संदीप संकपाळ, डॉ. राहुल माने परिश्रम घेत आहेत.