घरातील टाकाऊ वस्तू महापालिकेच्या वॉर्ड स्वच्छता कार्यालयात जमा करा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार शहरातील नागरीकांनी घरगुती वापरात नसलेल्या वस्तू योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या अनुषंगाने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी घरातील टाकाऊ वस्तू उघड्यावर अथवा इतरत्र न टाकता पालिकेच्या संबंधित स्वच्छता वॉर्ड कार्यालयात जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
या वस्तूंमध्ये जुने कपडे, उशी, गादी, कापडी साहित्य, खराब बॅटरी, ट्यूब लाईट, बल्ब, टाकाऊ इलेक्ट्रीक वस्तू, मुदतबाह्य औषधे, डास-कीटक नाशक औषधे, हजरडस्ट मटेरियल व जुनी पादत्राणे इत्यादींचा समावेश होतो.
महापालिकेच्या वतीने या सर्व वस्तू प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवार संकलित करण्यात येत आहे. मात्र, याशिवाय नागरिकांना सोमवार ते शनिवार, सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत देखील आपल्या संबंधित वॉर्डातील स्वच्छता कार्यालयात या वस्तू स्वखर्चाने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
यामध्ये स्वच्छता वॉर्ड कार्यालये - 1) ए/1 - कपिलतीर्थ मार्केट 2) ए/2 - कळंबा फिल्टर हाऊस 3) ए/3 - कॉ. गोविंदराव पानसरे शाळा, राजोपाध्ये नगर 4) बी - महाराणी ताराराणी विद्यालय, मंगळवार पेठ 5) सी/1 - कोबडी बाजार मटण मार्केट 6) सी/2 - खोल खंडोबा 7) डी - पंचगंगा हॉस्पिटल 8) ई/1 - वि.स. खांडेकर शाळा, रेड्याची टक्की 9) ई/2 - तात्यासो मोहिते हायस्कूल, व्यापारी पेठ 10) ई/3 - एस बॅकवरती, कावळा नाका 11) ई/4 - कसबा बावडा, पॅव्हेलियन ग्राउंड 12) ई/5 - दत्तमंदिर समोर, महाडिक माळ, रुईकर कॉलनी या ठिकाणांचा समावेश आहे.
हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.