छ. चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस प्रदान

नगर प्रतिनिधी: अहिल्यानगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा "छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार २०२४" शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित 'राजर्षी शाहूंची वाड्मयीन स्मारके' या बृहद्ग्रंथाला प्राप्त झाला. पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील राजर्षी शाहू सभागृहामध्ये शाही थाटात संपन्न झाले.
प्रारंभी हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते.
ॲड. विश्वासराव आठरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा. गणेश भगत यांनी केले. सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, दहा हजार रुपये रोख रक्कम, शाल व पुष्पगुच्छ असे आहे.
समाजाचे स्पंदन टिपण्याचे काम कवी व लेखक करतात. आपल्या लेखणीने जीवनाचा धांडोळा घेत असताना चौकटीपलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता निर्माण करत आहेत. या पिढीचे लेखक बंधन पाळत नसून, चौकटी बाहेर पडून आपले विचार व्यक्त करत आहेत. वैचारिक मानदंड व विचार आज समाजापर्यंत साहित्यिक घेऊन जात आहेत. मराठी साहित्य वेगळ्या वळणावर असून, यामध्ये काल्पनिक विश्व रंगविले जात नसून, संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब यामध्ये उमटत असल्याचे प्रतिपादन ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. पवार म्हणाले, आजचे वैचारिक प्रदूषण थांबविण्यासाठी लेखकांना समर्थपणे भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांच्या लेखणीतून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुन्हा रुजवावे लागणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षामध्ये या ग्रंथास तिसरा साहित्य पुरस्कार आणि राजर्षी शाहू महाराजांचे दत्तक वडील यांच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने विशेष आनंद झाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले. आभार दत्ता पाटील नारळे यांनी मानले.