तुम्हाला गृहमंत्री पद मिळाले आहे, ते विरोधकांना संपविण्यासाठी नाही , संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

तुम्हाला  गृहमंत्री पद मिळाले आहे, ते विरोधकांना संपविण्यासाठी नाही , संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : बीडमधील चित्र वाईट आहे. उद्धव ठाकरे लवकरच बीड आणि परभणी या ठिकाणी जातील. तर बिहारसारखे चित्र कल्याण आणि अंबरनाथमध्ये दिसत आहे. मी एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनापाठवला आहे. त्यांना अर्बन नक्षलवादची फार चिंता आहे. तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे, ते विरोधकांना संपविण्यासाठी नाही तर जनतेचे संरक्षण करा. लाडक्या बहिणींचं संरक्षण करा. परळी आणि आसपासच्या परिसरातील अनेक लाडक्या बहि‍णींचे कुंकू पुसले गेले आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. लाडक्या देवाभाऊंनी बदला घ्यावा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार लाडक्या बहि‍णींचे कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देताय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

दरम्यान, कल्याण येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून संजय राऊत म्हणाले की, कल्याण, अंबरनाथ हा उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात लुटमार, बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. गुंडांना अभय दिलं जातंय. आणि येथील खासदार मतदारसंघात फिरतही नाहीत. बलात्कार, खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्येच का असतात? देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.