जिल्ह्यात ‘हेक्टरी 125 मे.टन ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा’ उद्या शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषीदिन व हे.125 मे.टन ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा शुभारंभ उद्या कृषी दिनी होणार आहे. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान मधून राबविणेत येत असून या अभियान अंतर्गत 1 जुलै या दिवशी कृषी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हयातील शेतक-यांसाठी हेक्टरी 125 मेट्रिक टन ऊस उत्पादन हा उपक्रम राबविणेत येणार आहे.
या अभियानात भाग घेणा-या ऊस उत्पादक शेतक-यांना आकर्षक बक्षीसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविणेत येणार आहे. ऊस उत्पादकता वाढविणेसाठी तज्ञ मार्गदर्शक व नामांकित संस्थाव्दारे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रक्षेत्र भेटी व कार्यशाळांच्या माध्यमातून थेट शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना आवाहन करणेत येते कि आपण अभियानात मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे.
याच अनुषंगाने एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत शनिवार 05 जुलै रोजी जिल्हयातील सर्व मंत्री, खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व शासकीय अधिकारी शेतक-यांच्या भेटीला येणार आहेत.
अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.