डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे ‘इटालियन टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड’ ने सन्मान

इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईचे कामाक्षी सुंदरम, भाग्यश्री खाडे, शुभम हुल्ले आणि गौरव मर्दा या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या इटालियन टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी द असोसिएशन ऑफ इटालियन टेक्स्टाईल मशिनरी मॅन्युफॅक्चर्स (ऍसिमेट), इटालियन मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इटालियन ट्रेड एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी २०२४‘ या ऍवार्डने इटली येथे गौरविण्यात आले आहे.
डीकेटीईचे ऍसीमेट, इटली यांचेबरोबर २० वर्षापासून विविध उपक्रम कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण १८ विद्यार्थी व ७ प्राध्यापक यांनी याअंतर्गत परदेशी दौरा व इटालियन इंडस्ट्रीजना भेट देण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण देशांतून एकमेव डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी ही संधी मिळते. इटली येथील या पुरस्कार सोहळयास जगभरातून निवड झालेले संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील डीकेटीई संस्था येथून ४ विद्यार्थ्यांची निवड झाली यामुळे विद्यार्थ्यांना अनेकविध देशातील संशोधकांसोबत संवाद साधण्याची व ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डीकेटीईचा ठसा उमटवण्याची संधी मिळाली.
डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागामध्ये कार्यरत असणारे डॉ पी.बी.मलकाने व डॉ ए.जे.ढवळे समन्वयक म्हणून इटली येथे विद्यार्थ्यांसोबत गेले होते. त्यांनी इटेमा (रॅपिअर लूम), इएफआय रेगीनी (डिजीटल प्रिटींग), सॅन्टोनी (निटींग), मेसडान (फिनिशिंग) अशा अधुनिक इंडस्ट्रीजना भेटी दिल्या.
बी.टेक.टेक्स्टाईलच्या गौरव मर्दा विद्यार्थ्यांने डॉ एस.एन.जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इफेक्ट ऑफ टाईप्स ऑफ पाइल यार्न व पाईल हाईट इन टेरी टॉवेल फॅब्रीक मॅन्युफॅक्चरींग‘, तर कामाक्षी सुंदरम या विद्यार्थ्यांने डॉ मंजुनाथ बुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल थर्मल इन्सुलेशन मटेरिएल युजींग हेम्प फायबर‘ या विषयावर प्रकल्प पूर्ण केला. शुभम हुल्ले या विद्यार्थ्यांने डॉ पी.एम.काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टडीज ऑन ज्यूट काउडंग बायो कंम्पोझिट व भाग्यश्री खाडे या विद्यार्थीनीने डॉ अश्विनी रायबागी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिझाईन अँण्ड डेव्हलपमेंट ऑफ सस्टेनेबल ऍण्ड हायजिनिक सॅनीटरी नॅपकीन फ्रॉम वॉटर हायसिन्थ‘ या विषयावर प्रकल्प पूर्ण केला. या नाविण्यपूर्ण संशोधनात्मक प्रकल्पसाठी विद्यार्थ्यांची इटली येथे पुरस्कारासाठी निवड झाली त्यामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी अभ्यास दौरा करण्याची सुसंधी प्राप्त झाली. यामुळे पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
ऍसीमेट ही संस्था इटलीमधील वस्त्रोद्योगातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री उत्पादित करणा-या उत्पादकांची शिखर संस्था आहे. ही संस्था इटालियन मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व इटालियन ट्रेड एजन्सी यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी जागतिक पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी संशोधन स्पर्धा आयोजित करते.यासाठी जगातील विविध टेक्स्टाईल कॉलेजमधून अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व यशाचे शिखर गाठले.
विद्यार्थ्यांचा इटलीचा ये - जा चा सर्व खर्च, राहण्याचा व इतर खर्च इटालियन ट्रेड एजन्सीने केला होता. इटली येथे आयोजित पुरस्कार सोहळयामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना इटालियन ट्रेड एजन्सीच्या चिआरा ट्रोसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी अभिनंदन केलेे.