उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे सडेतोड प्रत्युत्तर

जळगाव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींवर जोरदार टीका केली. "मराठी माणसाची एकजूट होऊ नये म्हणून यांचे मालक त्यांच्या नोकरांकडून इकडच्या-तिकडच्या गाठीभेटी घेत आहेत," असा टोला ठाकरे यांनी लगावला. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे प्रत्युत्तर दिले. "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिउत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या जळगाव दौऱ्यावर असून, धरणगाव येथे क्रांतिकारक खाज्या नाईक यांच्या स्मारक व संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव केला जात असून, खाज्या नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचा भाग होण्याचा त्यांना अभिमान आहे.