दिव्यांगांची सेवा घडावी ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी- आमदार मेघना बोर्डीकर

दिव्यांगांची सेवा घडावी ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी- आमदार मेघना बोर्डीकर

सेलू प्रतिनिधी(गणेश साडेगावकर)

जिंतूर येथील पोदार् इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडून दिव्यांगांच्या साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांची उपस्थिती होती. या शिबिरात कृत्रिम हात, पाय, कुबड्या, व्हील चेअर ,इलेक्ट्रिक सायकल आदी बाराशे पन्नास साहित्याचे वाटप करण्यात येणार होते, पैकी 800 लाभधारकांनी या शिबिराचा लाभ घेतला.तब्बल दीड कोटी रुपयांचे साहित्य उपलब्ध करण्यात आले होते.

  आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, 2016साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांसाठी "दिव्यांग" हा सन्मानपूर्वक शब्द वापरला. यावरून दिव्यांगांबद्दल मोदींना किती प्रेम आहे, हे लक्षात येते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रथमच दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापित केले. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे दिव्यांगांसाठी कल्याण मंत्रालय उभारले आहे. दिव्यांगांपासून मला देखील जगण्याची नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते कारण बऱ्याच जणांनी दिव्यांगावर मात करून यशश्री खेचून आणली आहे. दिव्यांगांप्रति माझ्या मनात अपार प्रेम आहे. जिंतूर सेलू मतदारसंघातील माझ्या बांधवांनी मला भरभरून दिले. तेव्हा आपल्यासाठीही काही करणे माझे आद्य कर्तव्य बनते.आपल्या सेवेत त्यासाठी मी कुठेच कमी पडणार नाही. माझ्या मतदार संघातील सुशिक्षित तरुणांसाठी सुद्धा मागच्या हप्त्यात भव्य असा रोजगार मेळावा घेऊन चारशे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. दिव्यांगांसाठीही मला अजून खूप काही करायचे आहे. आज इथे माझे काही दिव्यांग बांधव येऊ शकले नाही त्यांच्यासाठी या वस्तू घरपोच पाठविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच या लाभापासून काही बांधव वंचित राहिले असतील त्यांच्यासाठीही आपण पुन्हा शिबिर घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.