धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही पद सोडणार ; अजित पवारांकडे व्यक्त केली नाराजी

मुंबई : धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याला २४ तासही उलटले नाहीत तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालक मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी होती. याशिवाय ते वैद्यकीय शिक्षण विभागाची धुरा सांभाळत आहेत. एकीकडे रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत वाद सुरु असताना हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रिपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
हसन मुश्रीफ यांची अजित पवार यांच्याकडे नाराजी
शिवसेना आणि भाजपच्या बहुतांश मंत्र्यांना स्वतःच्याच जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळालेली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना गृह जिल्ह्यांपासून लांबच्या ठिकाणांचं पालकत्व मिळत असल्याची तक्रार अनेक मंत्र्यांनी केली होती.
वारंवर प्रवास करताना अडचणी येत असल्याने मुश्रीफ यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा ८०० किमीचा प्रवास सातत्याने झेपत नसल्याचं सांगत मुश्रीफांनी पालक मंत्रिपद सोडू देण्याची विनंती अजित पवारांकडे केल्याची माहिती मिळत आहे.