गडहिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा टक्केवारीतील दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट - स्वाती कोरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे.त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता आता कंटाळली आहे.शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा भू- माफियांना आणि टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घाट मुश्रीफ यांनी घातला असून अशा भ्रष्ट प्रवृत्तीला गडहिंग्लजवासीय जनता या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून नक्की धडा शिकवतील अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
स्वाती कोरी पुढे म्हणाल्या, हजारो कोटींचा आपला घोटाळा लपविण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी जातीयवादी पक्षाचा आसरा घेतला हे जगजाहीर आहे.राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैशाच्या बळावर माणसं विकत घ्यायचा हा त्यांचा एककलमी फंडा सुरू आहे.शहरात त्यांची झुंडशाही आणि एकाधिकारशाही फोफावलेली आहे.स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी दिवंगत आम. श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडण्याचे पाप करत आहात. याची किंमत त्यांना नक्की या निवडणुकीत चुकवावी लागेल.
राजे समरजितसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले, पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या मुश्रीफांच्या मतदारसंघातील जनतेला उपचारांसाठी पुणे-मुंबईला जावे लागते हे त्यांच्या कर्तृत्वाचे अपयशच मानावे लागेल. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सात हजार कोटींच्या पुस्तकात शिक्षण,आरोग्य या महत्त्वपूर्ण कामांसाठी किती निधी खर्च केला याची आकडेवारी का दिली नाही ?असा सवाल उपस्थित करून त्यांच्या सत्तेची संपूर्ण हयात ही कंत्राटदार,ठेकेदार टोळीला पोसण्यासाठीच व्यतीत केली असल्याचे सांगितले.त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि कुटुंबातील या सद्यस्याला विधानसभेत पाठवा.तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन काम करेन असा विश्वास व्यक्त केला.
बसवराज आजरी, कुमार पाटील,काशीनाथ देवगौडा, संभाजी भोकरे, सुनील शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी शिवाजीराव खोत, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, ॲड .दिग्विजय कुराडे, रवींद्र घोरपडे, स्वाती खोत, दिलीप माने, बाबासाहेब पाटील खातेदार, प्रतिभा पाटील,अजित पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक रामदास कुराडे यांनी केले. संपतराव देसाई यांनी आभार मानले.
पालकमंत्र्यांनी जनतेचं वाटोळं केलं.......
यावेळी अमर चव्हाण म्हणाले,ज्यांना गडहिंग्लज शहरासह तालुक्याने तीन टर्म आमदार केलं त्या पालकमंत्री महोदयांनी येथील औद्योगिक वसाहतीत एकही मोठी कंपनी आणली नाही.गडहिंग्लज तालुक्यामध्ये जुगाराचे मात्र सात क्लब सुरू आहेत. ते क्लब कोणी आणि कोणासाठी आणले ? हाताला काम नसल्याने हतबल झालेली येथील तरुणाई जुगाराच्या विळख्यात पूर्णपणे अडकत चालली असून याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री आहेत.त्यांच्या अनेक गैरधंद्यांनी समाजस्वास्थ्य बिघडलेले असून येथील जनतेचं त्यांनी वाटोळं करण्याचं काम केलं असल्याचे सांगितले.