धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री

धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमिकेत दिसणार 'ही' लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : धर्म, संस्कृती आणि शौर्याचं प्रतीक ठरलेल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचं स्थान अत्युच्च आहे. धर्मरक्षणासाठी आणि समाजहितासाठी आपल्या जीवनाचं अर्पण करणाऱ्या या महानायक महाराणींचं थोर कार्य आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग’ या आगामी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट २३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका साकारत आहे आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे.या मालिकेतून अश्विनी महांगडे घराघरात पोहोचली. 

‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग’ या चित्रपटाची निर्मिती सोमनाथ शिंदे यांनी लयभारी प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली असून, प्रस्तुती नितीन धवणे फिल्म्स यांची आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सुशांत सोनवले यांनी सांभाळली आहे.

अहिल्याबाईंच्या आयुष्याची महागाथा सिनेमातून

ट्रेलरची सुरुवात रणधुमाळीने होते. तलवारींची खणखणाट आणि युद्धाच्या गर्जना अशा पार्श्वभूमीवर लहानग्या अहिल्यादेवींच्या एन्ट्रीसह “धनगराची लेक एक दिवस मराठा साम्राज्याचा भगवा सातासमुद्रापार फडकवेल” हा संवाद खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा ठरतो. शिवरायांच्या रायरेश्वर शपथेप्रमाणे अहिल्याबाई धर्मरक्षणाची शपथ घेतात आणि तिचं यशस्वी पालन करताना दिसतात.

१२ ज्योतिर्लिंगे, चार धाम आणि हजारो मंदिरे पुनर्स्थापित करणाऱ्या महाराणीने केवळ राज्यकारभारच नाही, तर अध्यात्म, सेवा आणि न्याय यांचा आदर्श मांडला. याच अद्वितीय कार्याची प्रेरणादायी गाथा चित्रपटातून उलगडणार आहे.

कलाकारांची सशक्त फळी

या चित्रपटात 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडे या अहिल्यादेवींच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या जोडीला राहुल राजे, सुहास जाधव, संदेश कदम, संजय खापरे, शिवा रिंदानी, संजीवनी जाधव आणि इतर अनुभवी कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे.

हृदयस्पर्शी संवाद आणि दर्जेदार सादरीकरण

"हिंदू हा फक्त धर्म नाही, तर जगाला शिकवण देणारी तुकोबारायांची गाथा आहे", अशा प्रभावी संवादांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांमध्ये रोमांच निर्माण करतो. १७६७ ते १७९५ या कालखंडात माळव्यात राजवट चालवणाऱ्या तत्त्वज्ञानी महाराणीच्या आयुष्याचा सखोल वेध घेणारा हा सिनेमा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.