नागरी बँकांच्या सभासदांसाठी 20 डिसेंबर रोजी प्रशिक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी : नागरी बँक असोसिएशन कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, नागरी सहकारी बँकांच्या सभासदांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठात होणार आहे.
सध्या बँकिंग क्षेत्र वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सहकारी बँका सर्वसामान्यांच्या बँका म्हणून ओळखल्या जात आहेत. तत्पर सेवेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानही सहकारी बँका आत्मसात करत आहेत.
सहकाराचा विकास व्हावा म्हणून केंद्र सरकारनेही सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय चालू केले आहे. रिझर्व्ह बँकेनेदेखील सहकारी बँकांनी सभासदांना प्रशिक्षित करण्याच्या बँकाना सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, आणि बँक असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक शिरीष कणेरकर यांच्या हस्ते होणार आहे.