राज्यात अनोखा मंत्रिमंडळाचा विस्तार ; पहाटेच्या शपथविधी नंतर आता दुपारच्या शपथविधीची जोरदार चर्चा
कोल्हापूर (प्रतिनिधी) :
राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथ घेतली. आज अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आता पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारची शपथविधी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी पवारांना उपुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळं आज एकूण ९ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याचे कामकाज आता दोन उपमुख्यमंत्री पाहणार आहेत.