निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा प्रश्न

निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का?  सतेज पाटलांचा प्रश्न

कोल्हापूर प्रतिनीधी : गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का?  असा प्रश्न विचारत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केलीय. 

काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी जबरदस्तीनं धर्मांतर होत असल्याचा दावा केला होता. जबरदस्तीनं धर्मांतर होत असेल, तर संबंधितांवर कारवाई करा. अन्यथा, कोल्हापूरची बदनामी करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मिलिंद परांडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांनी केली होती. यावर अद्याप कोणतीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही.

यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळलीय. याबाबतची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पोलीस यंत्रणा राजकीय यंत्रणेत अडकल्याचं दिसून येतंय. कोल्हापुरात दर दोन दिवसांला एक खून होतोय, तर कळंबा कारागृहात नवनवीन गोष्टी सापडतायत. याकडं पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.