परसबाग स्पर्धेत केंद्रशाळा शेडशाळ कोल्हापूर जिल्हयात प्रथम

परसबाग स्पर्धेत केंद्रशाळा शेडशाळ कोल्हापूर जिल्हयात प्रथम

कोल्हापूर : परसबाग स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील शेडशाळ या केंद्रशाळेने कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने 1 ली ते 5 वी व 6 वी ते 8 वी तील विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळांच्या परिसरात परसबाग निर्माण करुन, त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भाजीपाल्याचा वापर दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये करण्यात येतो.मुलांना पोषक व ताज्या भाजीपाल्याचा वापर त्यांच्या आहारात नियमीतपणे व्हावा व मुलांचे आरोग्य चांगले रहावे या उदात्त हेतूने शासनाने परसबाग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलले आहे. 

कोल्हापूर जिल्हयातील एकूण 3017 शाळांपैकी  2625  इतक्या शाळांनी परसबागा निर्माण केलेल्या आहेत. ज्या शाळांना जागा नाही अशा शाळांनी टेरेस, लाफट, कुंडयां इ. चा वापर करुन वेलवर्गीय भाज्यांची लागवड केलेली आहे. यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक),  मीना शेंडकर, संबंधित तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी व अधिक्षक, विस्तार अधिकारी व सर्व संबंधित यांनी महत्वपूर्ण भूमिका व मार्गदर्शन केलेले आहे.

या शाळांनी परसबाग निर्माण करण्यासाठी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून शासनाने जिल्हा स्तरावरील पहिल्या 3 क्रमांकासाठी एकूण रु. 33,500/- व तालुकास्तरावरील पहिल्या 3 क्रमांकासाठी व 3 प्रोत्साहनपर शाळांसाठी एकूण रु. 21,500/- प्रमाणे 12 तालुक्यांना रु. 2,58,000/- असे एकूण कोल्हापूर जिल्हयासाठी एकूण रु. 2,91,500/- बक्षिस जाहीर केलेले आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 12 तालुक्यांतील प्रथम आलेल्या परसबाग शाळांची तपासणी व पहाणी करण्यासाठी डॉ. विश्वास सुतार, गट शिक्षण अधिकारी, शाहुवाडी, वसुंधरा कदम, अधिक्षक गगनबावडा,  प्रकाश नलवडे, अधिक्षक हातकणंगले व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लेखाधिकारी  संजय कुंभार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. 

या तपासणी पथकांनी दि. 01जानेवारी 2025 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्यक्ष पहाणी करुन सादर केलेल्या गुणांकन अहवालानुसार कोल्हापूर जिल्हयातील प्रथम क्रमांक केंद्र शाळा शेडशाळ ता. शिरोळ, व्दितीय क्रमांक वि.मं. महिपाळगड, ता. चंदगड व तृतीय क्रमांक विभागून 2 शाळांना केंद्र शाळा पारगाव ता. हातकणंगले व वि. मं. चंद्रे ता. राधानगरी यांना मिळालेला आहे.

या सर्व शाळांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत असल्याने इतर शाळा बक्षिसपात्र शाळांचे अनुकरण करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. गतवर्षी प्रथम क्रमांक मिळविलेल्या वि. मं. मळवी, ता. चंदगड यांना राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक व नावलौकीक मिळविण्याची संधी केंद्र शाळा शेडशाळ ता. शिरोळ यांना मिळण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असुन या शाळेची तपासणी राज्य स्तरावरील पथकाकडून नजीकच्या काळात होणार आहे. यासाठी सर्वांना  मुख्य कार्यकारी अधिकारी व  शिणाधिकारी - प्राथमिक यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.