बांगलादेशातील राजकीय अस्थिरता: शेख हसीना यांनी दिला राजीनामा, भारत सतर्क

बांगलादेशातील राजकीय अस्थिरता: शेख हसीना यांनी दिला राजीनामा, भारत सतर्क

वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलनाने प्रचंड चिघळल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशाबाहेर पलायन केले. त्यांच्या १५ वर्षांच्या राजवटीला अचानक समाप्ती आली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेश लष्करप्रमुखांनी हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

शेख हसीना यांनी देश सोडताच हुल्लडबाजांनी ढाकाच्या दिशेने कुच केली आणि पंतप्रधान निवासस्थावर हल्ला चढवला. या घटनेमुळे बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून शेख हसीना सध्या भारताच्या आश्रयास आल्या आहेत. त्यांच्या प्रकरणी भारत लवकरच निर्णय घेणार आहे. या संदर्भात आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांगलादेशातील अलीकडील घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. सरकारकडून मिळालेल्या माहितीनंतर गांधी यांनी राष्ट्रीय हितासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना पाठिंबा दर्शवला. त्यांनी परदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाबाबत प्रश्न उपस्थित केला आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मालमत्तेवर झालेल्या हल्ल्यांच्या अहवालांचा हवाला देत त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारतीय लष्कराला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारने वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली असून बांगलादेशातील घडामोडींचा भारतावर होणाऱ्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करत आहे. भारत सरकार बांगलादेश लष्कराच्या संपर्कात असून भारतीय लष्कराला सतर्क केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, “आपल्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.”

भारत आणि बांगलादेशातील या गंभीर परिस्थितीचा आगामी काळात काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.