बांगलादेशातील हिंसाचार उफाळला; शेख हसीना देश सोडून भारतात दाखल

बांगलादेशातील हिंसाचार उफाळला; शेख हसीना देश सोडून भारतात दाखल

वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या जाळपोळीनंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्वत्र हिंसाचार होत असून सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून देश सोडला आहे. त्या विशेष हेलिकॉप्टरने भारतात दाखल झाल्या आहेत. सध्या लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान देशाला संबोधित करण्याची तयारी करत आहेत.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी कर्फ्यूला झुगारून शाहबाग चौकात लाँग मार्चसाठी जमले आहेत. हिंसाचारात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारने भारतीय नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला असून सध्या तिथे असलेल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतीय उच्चायुक्तांनी आपत्कालीन फोन नंबरद्वारे संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत.