महायुतीची आजची बैठक रद्द; मुख्यमंत्री गावी रवाना
मुंबई : काल रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांच्या निवासस्थानी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत अमित शहा यांनी विविध सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. आज पुन्हा मुंबईत महायुतीची बैठक होणार होती परंतु अचानकपणे ही बैठक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन दिवस बैठक होणार नसल्याचेही सूत्रांकडून समजत आहे.
एकनाथ शिंदे देरे सातारा कडे रवाना
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या महायुतीच्या तीन नेत्यांची बैठक आज मुंबईत होणार होती. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी केलेल्या सूचनांबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. परंतु आजची महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ही बैठक होणार नाही. भाजपचा महाराष्ट्र गटनेता निवड झाल्यावर महायुतीची ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे मुळगाव असलेले देरे सातारा येथे जाणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे म्हणतात महायुतीत सर्व काही अलबेल, पण चेहरा मात्र...
काल दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापने संदर्भात अमित शहा यांनी सूचना केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी बैठकीतून अजित पवार स्मितहास्य करताना बाहेर पडत असल्याचे दिसून आले. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाऊ शकते. या बैठकीनंतर चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पडलेला चेहरा.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवला असला तरी कालच्या महायुतीच्या झालेल्या बैठकीत त्यांचा चेहरा पडल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच महायुतीत सर्व काही अलबेला नसल्याच्या चर्चांना उधान आली आहे.