महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा सन्मान राखणारे, त्यांचा आदर करणारे आ. ऋतुराज पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले. आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, आपण सर्व महिला या स्वाभिमानी व कष्टकरी आहोत. सर्वच क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत. ऋतुराज पाटील हे महिलांचा सन्मान राखणारा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण देणाऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत. सर्व सामान्यामध्ये मिसळणारे नेतृत्व आपल्याला पुन्हा निवडून द्यायचे आहे.
महिला प्रदेश काँग्रेसच्या सचिव भारती पोवार म्हणाल्या, महिलांचा अपमान करणारे महाडिक पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होते. या काळात मिळालेले मानधन त्यांनी पक्षाकडे जमा करावे आणि मगच महिला भगिनींना फुकाचे सल्ले द्यावेत.
पुजा ऋतुराज पाटील म्हणाल्या, आ. ऋतुराज पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवून अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे. ‘मी दुर्गा’या उपक्रमातर्गत १५ हजाराहून अधिक शालेय विद्यार्थीना सुरक्षित बनवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन केले. या पुढील काळात बचत गटांतील महिलांची उत्पादने घरबसल्या विकली जातील अशी बाजारपेठ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
खासदार धनंजय महाडिक यांची महिलांबद्दल असलेल्या भावना, त्यांची वृत्ती, संस्कृती आपण सर्वांनी पाहिलीच आहे. महिलांना पायाखालची धूळ समजणाऱ्या महाडिकांना ताराराणीच्या लेकी धडा शिकवतील असा इशारा कोल्हापूर दक्षिण महिला काँग्रेस कौशल्य विभाग प्रमुख राणी खंडागळे यांनी दिला.
शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले माजी सभापती पुनम जाधव, जि.प. माजी सदस्य मंगल वळकुंजे, माजी सरपंच मालुताई काळे, संजीवनी वळकुजे, सुरेखा चौगुले, ग्रा. पं. सदस्य सुनिता चव्हाण सारिका माने, नीता हावळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, वैजयंती यादव, त्रिशा पाटील, जयश्री पाटील, माजी उपसरपंच मनीषा गाताडे, उमा कदम, कल्पना चौगुले महिला उपस्थित होत्या.
महिलांना धमकावण्याची भाषा महाडिकांना महागात पडेल- अश्विनी चव्हाण
आम्ही लाचार नाही, स्वाभिमानी आहोत हे महाडीकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला तुम्ही दीड हजार दिले म्हणजे विकत घेतले असे समजू नका. एकवेळ उपाशी राहू ,पण अशी लाचारी स्वीकारणार नाही. महिलांना धमकावण्याची भाषा महाडिकांना महागात पडेल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अश्विनी चव्हाण यांनी दिला.