एका नगरसेवकाला आमदार करण्याची ताकद कोल्हापुरच्या जनतेत आहे हे दाखवून द्या - सतेज पाटील

एका नगरसेवकाला आमदार करण्याची ताकद कोल्हापुरच्या जनतेत आहे हे दाखवून द्या - सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : राजेश लाटकर हा आपला माणूस आहे, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून कार्य करणारा तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तुमच्या आमच्या हक्काचा आमदार म्हणून राजू लाटकर काम करेल. राजू सर्वाना आपल्या घरचा वाटतो. तो मोटरसायकलवर फिरणारा पहिला आमदार असणार, त्यामुळे त्याला बळ द्या व आपल्यातील या कार्यकर्त्याला आमदार म्हणून संधी देऊन महाराष्ट्रात इतिहास घडवूया असे मनोगत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. कसबा बावड्यातील रिक्षाचालक व्यावसायिक संघटनांनी महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, ती पैश्याला भुलत नाही, एका नगरसेवकाला आमदार करू शकते हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. ताठ मानेने जगणाऱ्या कोल्हापुरातील नागरिकांचा आमदार हा राजेश लाटकर यांच्यासारखा स्वाभिमानी असावा. प्रेशर कुकरचे चिन्ह घरोघरी पोहोचवून हि लढाई तुम्ही आम्ही जिंकायची आहे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना उमेदवार राजेश लाटकर यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले. यावेळी बोलताना महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्व रिक्षाचालक व्यावसायिक संघटनांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मी सर्वसामान्य कार्यकर्ता असून अनेक वर्षांपासून जनतेशी संपर्क ठेवून सामान्य लोकांशी नाळ घट्ट केली. सर्वांशी एकसंघ होऊन कामे केली आहेत. जनतेने आमदार म्हणून संधी दिल्यास रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन असे आश्वासन लाटकर यांनी यावेळी दिले.

माझे सारे जीवनचरित्र तुमच्यासमोर आहे, तसेच सुरवातीच्या काळात मीही रिक्षा चालवत असल्याने तुमच्या व्यथा आणि वेदना मला माहीत आहेत. तुमचा कणा ज्यामुळे दुखतो आणि रिक्षाचा मेटेंनन्स ज्यामुळे वाढतो अशा रस्त्याचा प्रश्न सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन मी तुम्हाला देतो. भ्रष्टाचाराची दहशत विरुद्ध स्वाभिमानी जनतेचा आशीर्वाद अशी ही निवडणूक आहे. नो खंडणी नो कमिशन हेच माझे मिशन आहे. सर्व रिक्षा चालक व्यवसायिकांची तसेच मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असून माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी आणि जनतेसाठी असेल असे ते म्हणाले. यावेळी कसबा बावड्यातील रिक्षा व्यवसायिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.