माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ते वयाच्या ९२ वर्षाचे होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

काही महिन्यापासून मनमोहन सिंग यांची तबियत बिघडली होती.  त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  काल गुरुवारी रात्री ८ वाजता  त्यांची तब्येत नाजूक झाल्याने एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली.  

मिळालेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत अनेकदा बिघडली होती. गुरुवारी २६ डिसेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तसंच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. 

डॉ. मनमोहन सिंग यांचे करिअर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुरु  झाले. जागतिक कीर्तीचे, अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्य सभेचे खासदार, अर्थमंत्री, पंतप्रधान  अशी त्यांनी महत्वाची पदे भूषवली. ते १९८२ ते १९८५ या काळात  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. १९९१ पासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती.