मिरजमध्ये भरदिवसा दोन गटांमध्ये तुफान राडा ; परिसरात भीतीचे वातावरण

मिरजमध्ये भरदिवसा दोन गटांमध्ये तुफान राडा ; परिसरात भीतीचे वातावरण

सांगली - सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यात एका संशयिताने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. ही घटना मिरजमधील चर्च परिसरात घडली असून, त्यामुळे परिसरात भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. संशयित गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चर्चजवळ दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या गोंधळात परिसरातील एका सलून दुकानाची तोडफोड करण्यात आली. इतकंच नव्हे, तर एका संशयिताने पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाद नेमका कशामुळे झाला? त्यामागील कारणे काय होती? आणि गोळीबार करणारा आरोपी कोण होता? याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या हल्ल्यात कोणी जखमी झालंय का, याबाबतचा अधिक तपास मिरज पोलीस करीत आहेत. 

शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या घडलेली ही घटना पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. मिरज पोलिसांकडून आरोपींचा शोध आणि घटनेमागचं सत्य उघड करण्यासाठी तपास सुरू आहे.