Chatrapati Sambhajinagar : बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण करून बेदम मारहाण, डोक्यावर पिस्तूल लावलं...

छत्रपती संभाजीनगर : प्लॉट खरेदी - विक्रीचं काम करून टेंडर देणाऱ्या तरुणाने काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केलं. याचा राग मनात धरुन पोलीस पुत्राकडून बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर डोक्यावर पिस्तूल लावून तुला जीवे मारून डोंगरात फेकून देतो, माझं कुणी काही करणार नाही, अशी धमकी दिली. व्यावसायिकाच्या मित्राला दाबून ठेवत त्याचा लॅपटॉप मोबाईल हिसकावण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सुधाकर नगर परिसरामध्ये घडला. याप्रकरणी पोलीस पुत्रासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद भवसिंग राठोड, वय ३३, राहणार कुमावत नगर देवळाई चौक सातारा परिसर, असे अपहरण झालेल्या बांधकाम व्यवसायकाचे नाव आहे. संदीप भाऊसाहेब शिरसाट, त्याचा पोलीस खात्यातील भाऊ मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड हर्षल निखिल कांबळे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शरद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राठोड हे बांधकाम क्षेत्रात काम करतात. त्यांची अभिजीत उर्फ बंटी बाळासाहेब बर्डे, वय २८ याच्याशी सहा वर्षांपूर्वी ओळख झाली. पूर्वी अभिजीत हा भवसिंग राठोड यांच्या मामेभावाच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्यापूर्वी तो संदीप शिरसाठ यांच्याकडे प्रॉपर्टी खरेदी - विक्री आणि शासकीय टेंडर देण्याचं काम करत होता.
संदीप शिरसाठ यांच्याकडे अभिजीत कामाला असताना संदीप शिरसाट हा अभिजीतला प्रचंड त्रास देत होता. जेवण न देणं, मारहाण होत असल्याने अभिजीत या त्रासाला कंटाळला होता. यामुळे अभिजीत याने काम सोडून तो राठोड यांच्या कार्यालयात काम करू लागला. दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास राठोड हे एका हॉटेलमध्ये जेवण करून परतत होते. यावेळी तिथे संदीप शिरसाठ आणि त्याचे साथीदार आले. त्यांनी राठोड यांना ऑफिसचं काम आहे म्हणत वाहनात बसवलं. त्यानंतर संदीप शिरसाठ राहत असलेल्या सुधारक नगर परिसरातील ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्या ऑफिसमध्ये निखिलेश कांबळे आणि त्याच्या १५ साथीदारांनी आळीपाळीने राठोड यांना प्रचंड मारहाण केली. केबल रॉड, बेल्ट यासह लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्यामुळे राठोड गंभीर जखमी झाले होते. यावेळी राठोड यांची दुचाकीची चावी, मोबाईल आणि सोन्याची चैन हिसकावून घेतली.
तुला जिवे मारून डोंगरात फेकून देईल...
त्यानंतर संदीप शिरसाट याने राठोड यांना याच्या डोक्याला बंदूक लावत तुला जिवे मारून डोंगरात फेकून देईल, माझे कुणी काही करू शकत नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर संदीपने राठोड यांना अभिजीत याला पेट्रोल संपला आहे असं सांगून बोलावले. त्यानंतर संदीपने बंटीला ही दाबून ठेवत विवस्त्र करुन जबर मारहाण केली. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक शरद राठोड यांनी पोलीस आयुक्तालय गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सातारा पोलीस ठाण्यात संदीप शिरसाटसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.