'त्या' मित्रासाठी नाना पाटेकरांनी स्वत: चं घर गहाण ठेवलेलं

मुंबई - नाना पाटेकर हे केवळ दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या थेट आणि स्पष्ट स्वभावासाठीही ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्यावर आदरभाव ठेवतात, काहीजण त्यांच्या परखडपणामुळे घाबरतातही. मात्र नानांची एक वेगळी बाजू (माणुसकीची) फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे जवळचे सांगतात की, नाना कोणतीही मदत मागणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. त्यांच्या मैत्रीसाठी झोकून देणारा स्वभाव या आधीही अनेकदा समोर आला आहे. असाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे. ज्यात नानांनी आपल्या जवळच्या मित्रासाठी, दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्यासाठी स्वतःचं घर गहाण ठेवलेलं होतं.
एन. चंद्रा, ज्यांनी 'अंकुश' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि ज्यातून नाना पाटेकरांना खरी ओळख मिळाली, ते एकदा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. सर्व मार्ग बंद झाल्यावर त्यांनी शेवटी नानांकडून मदत मागितली. त्या काळात नानांकडेही मोठी रक्कम नव्हती. मात्र मित्र संकटात असताना ते हातावर हात ठेवून बसले नाहीत. त्यांनी थेट आपलं घर गहाण ठेवून चंद्रा यांना गरजीनुसार पैसे दिले. नंतर चंद्रा यांनी पैसे परत केल्यावर नानांना त्यांचं घर पुन्हा मिळालं. कृतज्ञतेपोटी चंद्रा यांनी नानांना एक स्कूटर भेट दिली. ही त्यांच्या मैत्रीची आठवण आजही विशेष मानली जाते.
नाना पाटेकरांचा हा उदार स्वभाव फक्त मित्रापुरता मर्यादित नाही. 'नाम फाउंडेशन' च्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ते सातत्याने सामाजिक कामांमध्ये सहभागी राहिले आहेत. सध्या नाना ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच त्यांच्या आगामी सिनेमांचं शूटिंगही सुरू आहे.