'या' अभिनेत्रीचं संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्विट , आमदार चित्रा वाघ भडकल्या , म्हणाल्या...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नेहमीच सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर ती व्यक्त होत असते. नुकत्याच तिनं केलेल्या एका ट्विटमुळं तिच्यावर टीका होत आहे.
विकी कौशल अभिनीत छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग पाहून प्रेक्षक रडताना दिसत आहेत . त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहून अंगावर काटा येतोय, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत असतानाच स्वरानं भलतंच ट्विट करत वाद निर्माण केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा काल्पनिक असल्याचं भलतंच वक्तव्य तिनं तिच्या ट्विटमध्ये केलंय. यावर आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी तिला सडेतोड उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत स्वराला सुनावलं आहे.
काय होतं स्वराचं ट्विट?
सरकारी व्यवस्थापनातील अभाव आणि त्यामुळं चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झालेत. बुलडोझरच्या मदतीनं त्यांचे मृतदेह काढावे लागल्याचं समोर आलंय. यावर शोक व्यक्त न करता आपला समाज ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक तसंच फिल्मी अत्याचारांवर संताप व्यक्त करताना दिसतोय. आपला समाज मनानं आणि आत्मानं देखील मुर्दाड बनलाय, असं तिनं म्हटलं होतं.
काय म्हणाल्या आमदार चित्रा वाघ ?
दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती. स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्या देखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच.त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला.आजही जेव्हा सत्य समोर येतंय खरा इतिहास लोकांना कळतोय तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलय.त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर... तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे.