मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज,म्हणाले...
नागपूर :नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. ''जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं'', असं म्हणत छगन भुजबळांनी आपली नाराजी स्पष्ट जाहीर केली आहे.
नाराज भुजबळांची प्रमोद हिंदूराव यांनी घेतली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव यांनी त्यांची भेट घेतली.