राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा ; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा ; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता

Jayant Patil Resigns: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून, त्यांची जागा आता शशिकांत शिंदे घेणार आहेत. १५ जुलै रोजी शिंदे अधिकृतपणे प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांनी स्वतः पदमुक्त करण्याची मागणी पक्षाकडे केली होती.

"नवीन चेहऱ्यांना संधी द्या" – जयंत पाटील

१० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी जाहीरपणे पदत्यागाची इच्छा व्यक्त केली होती. "मला पवार साहेबांनी सात वर्षं मोठ्या जबाबदारीची संधी दिली. आता नव्या चेहऱ्यांना पुढे आणणे गरजेचे आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे आणि त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा," असंही जयंत पाटील म्हणाले होते.

शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया - 

प्रदेशाध्यक्षपदावर निवडीच्या चर्चांनंतर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "अजून निर्णय अधिकृत नाही. पवार साहेब, सुप्रिया ताई आणि जयंत पाटील यांच्यासह पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. आम्ही सर्व एकजुटीनं काम करू. जयंत पाटील यांनी केलेल्या कामाची तुलना होऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले, पक्ष सध्या संघर्षाच्या टप्प्यावर आहे. अशा वेळी नव्या नेतृत्वाला जबाबदारी देणं महत्त्वाचं आहे. आम्ही एकसंघ राहून पक्षाची प्रतिष्ठा वाढवू असंही शशिकांत शिंदे म्हणाले. 

राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, "निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात होते, पण बेरोजगारीचं वास्तव लोकांना ठाऊक आहे. नवीन लोकांना संधी देणं आणि त्यांच्याकडून नेतृत्व उभं करणं हे पवार साहेबांचं वैशिष्ट्य आहे. मला संधी मिळाली, तर आर. आर. पाटील यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सध्या शेतकरी आणि युवकवर्गाचे प्रश्न सर्वात मोठं आव्हान आहेत."

शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास - 

शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत.

त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून माथाडी कामगार चळवळीत सक्रिय होते.

१९९९ मध्ये जावळी मतदारसंघातून विधानसभेत पदार्पण; १२,००० मतांनी विजय.

२००९–२०१४ दरम्यान कोरेगाव मतदारसंघाचे आमदार आणि जलसंपदामंत्री म्हणून कार्यरत.

त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

सध्या ते विधान परिषदेचे आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.