आ. संजय शिरसाट पैसे प्रकरणावर खा. संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

मुंबई - शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका करत, हे विधेयक दलित, आदिवासी आणि शोषित वर्गांच्या आवाजाला गळा घालणारे असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारलं की, "हा कायदा भाजपचा 'सुरक्षा' कायदा आहे का?" आणि मिसा कायद्याची आठवण करून देणारा असल्याचे सांगितले. त्यांनी या विधेयकाला ठाम विरोध दर्शवला. भाजप आमदार संजय शिरसाट यांच्यावरील कथित भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही राऊत यांनी केली. “माहिती प्रसिद्ध होण्याआधीच ती मीडियात कशी आली?” असा सवाल करत त्यांनी शंका व्यक्त केली की, काही ‘बॅगा’ अजूनही कपाटात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली. तसेच सरकारची प्रतिमा यामुळे स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले.
"मी सरकारचा दलाल नाही" – राऊतांचा खुला इशारा
"सामनाच्या संपादकावर कायदेशीर कारवाई नवीन नाही. मी सरकारचा दलाल नाही, तर विरोधी पक्षातील नेता आहे," असं सांगून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. संविधानाने दिलेले अधिकार आम्ही वापरत आहोत आणि गद्दारांविरोधात संघर्ष सुरु असल्याचे ते म्हणाले. "हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर आक्रमण करत आहे. हे मुघलांचे वंशज आहेत," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, "जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांना आम्ही पाण्यात पाहू," असा इशाराही त्यांनी दिला.