शंभर कोटी रस्त्यांच्या कामाची चौकशी करा - प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरात गेले वर्षभर १०० कोटींतून रस्ते केले जात आहेत. त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून पावसाळा संपायच्या आतच अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे १०० कोटी निधीतून झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले.
शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे पुढे म्हणाल्या, राज्य शासनाकडून शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यात महापालिकेचा ३० कोटींचा हिस्सा आहे. त्यातून शहरातील १६ रस्ते चकाचक करण्याचे स्वप्न दाखविण्यात आले. डिसेंबर २०२३ ला वर्कऑर्डर दिल्यानंतर रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाची मुदत होती. रस्ते कामाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतू अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. तसेच झालेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. गुणवपत्तापूर्ण कामे झाली नसल्याने अनेक रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही रस्त्यांचा संपूर्ण सिलकोट निघून गेल्याने खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यासाठी आलेला निधी गेला तरी कुठे? असा प्रश्न आहे. सार्वजनिक निधीची उधळपट्टी केली जात आहे. तसेच मुदत संपली तरी अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे रस्ते कामाची त्रयस्थ संस्थेकडून सखोल चौकशी करून घ्यावी असंही त्या म्हणाल्या.