शेतकऱ्यांच्या मानगुटीवर 'शक्तीपीठ'चे भूत बसविणारे आबिटकर आता घरी बसणार :के पी पाटील यांचा घणाघात
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्या आमदार आबिटकरांनी राधानगरी मतदार संघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मानगुटीवर शक्तीपीठ महामार्गाचे भूत बसविले त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखविणार असा घणाघात माजी आमदार के पी पाटील यांनी केला.
शक्तीपीठ महामार्गाचे श्रेय घेण्यात आधी सर्वांत आघाडीवर असणाऱ्या या आमदार महोदयांनी शेतकऱ्यांचा विरोध पाहून लगेचच यू टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही श्री पाटील यांनी लगावला.
वाघापूर (ता.भुदरगड) येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले,"नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्या झाल्या भलामोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि याची मंजुरी आपणच घेतल्याचे उर बडवून सांगणारे आमदार आबिटकर शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून मात्र तोच डिजिटल बोर्ड उतरवून घेत 'मी तुमच्या बाजूने' असा केविलवाणा पवित्रा घेताना या मतदारसंघाने पाहिले आहे. या शक्तीपीठ महामार्गासाठी मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हायची वेळ येणार आहे. हे टक्केवारीत आणि भागीदारीत बक्कळ पैसे कमवून जमिनी घेत सुटलेत आणि अशा महामार्गामुळे इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती आहे. या महामार्गावरून माझ्या गोरगरीब शेतकऱ्याची सायकल, बैलगाडी जाणार नसून तुमच्या महागड्या गाड्या फिरण्यासाठी आणि महामार्गाच्या पैशातून कमिशन उकळण्यासाठी जर हा महामार्ग तुम्ही करीत असाल तर मी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने दंड थोपटणारच."
बापूसाहेब आरडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सचिन धैर्यशील देसाई घोरपडे,संग्राम देसाई,पंडितराव केणे,बाळासाहेब गुरव आदींची भाषणे झाली. सभेसाठी राहुल देसाई, शिवराज देसाई, सुनील कांबळे, भिकाजी एकल, दिलीप केणे, संपत कळके, बी आर कांबळे, प्रकाश कुलकर्णी, बाळासाहेब केणे, मारुती कदम, भीमराव किल्लेदार आदी उपस्थित होते. सभेपूर्वी व्हणगुती,मडिलगे बुद्रुक,गंगापूर, पळशिवणे आदी गावांचा प्रचार दौरा झाला.
*कोटींची कामे कागदावर... हा तर नुसता आकड्यांचा खेळ !*
विकासकामांसाठी कोटींचा निधी आणल्याचा ढोल बडवणाऱ्या आमदारांनी कमिशनचा नाद सोडून कामांच्या दर्जाबाबत दक्षता घेतली असती तर मतदारसंघात विकासकामे सुस्थितीत दिसली असती. उगाचच मोघमात कोटींची विकासकामे झाले म्हणणाऱ्यांची ही कामे कागदावर असून हा नुसता आकड्यांचा खेळ त्यांनी मांडला आहे,असे के पी पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.