संजय राऊत पंतप्रधानांवर निशाणा साधत म्हणाले, "७५ वयानंतर निवृत्तीचाच नियम केला होता, मग स्वतः वर ...

संजय राऊत पंतप्रधानांवर निशाणा साधत म्हणाले, "७५ वयानंतर निवृत्तीचाच नियम केला होता, मग स्वतः वर ...

मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीबाबतच्या सूचनेवर प्रतिक्रिया दिली आहे. भागवत यांनी ७५ वयानंतर निवृत्तीचा नियम सूचित केला होता, त्यावर भाष्य करत राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले होते, तेव्हा भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काय संवाद झाला, याचा मी रोखठोकपणे सारांश टाकला होता. संघ आणि भाजपनेच ठरवलं होतं की ७५ वयानंतर नेत्यांनी सत्तेच्या पदावरून निवृत्त व्हावं. हेच कारण देत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांना बाजूला करण्यात आलं. पण आता तोच नियम पंतप्रधान मोदींवर का लागू होत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पंतप्रधान मोदी यांना येत्या सप्टेंबरमध्ये ७५ वर्षं पूर्ण होतात. त्यांनी सत्तेची सर्व सुखं अनुभवली आहेत, जगभ्रमण केलं आहे. आता संघ वारंवार त्यांना सुचवत आहे की तुम्ही निवृत्त व्हा आणि देश सुरक्षित हातात सोपवा," असंही राऊत म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती व अध्यात्माकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली. यावर संजय राऊत म्हणाले, "कोण काय करणार हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. निवृत्तीनंतर अनेकजण सामाजिक कामात गुंततात. पण या दोघांच्याही मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, ही देशासाठी सकारात्मक बाब आहे."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुमारे १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. यामुळे दोघे आगामी निवडणुका एकत्र लढणार का, यावर चर्चा सुरू आहे. यावर राऊत म्हणाले, मी असं म्हटलं नाही की शिवसेना आणि मनसे निवडणूक एकत्र लढतील. पण जनतेचा मोठा दबाव आहे, विशेषतः मुंबई महापालिकेसाठी.

५ जुलै रोजी वरळीत झालेली विजयी रॅली हेच दाखवते की जनतेची इच्छा काय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात. मुंबईला वाचवायचं असेल, मराठी माणसाचा हक्क टिकवायचा असेल तर राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं गरजेचं आहे, असं लोक मानतात असंही राऊत म्हणाले.