...तर चंद्रहार पाटलांचे स्वागतच : खा. श्रीकांत शिंदे

सांगली: चंद्रहार पाटील हे पैलवान असल्याने त्यांचीही स्वतःची ताकद आहे, चंद्रहार पाटील हा एक चांगला कार्यकर्ता आहे, चांगल्या कार्यकर्त्यांना आमच्या पक्षामध्ये वाव आहे. शिवसेनेची दारे सगळ्यांसाठी उघडी आहेत, येणाऱ्या काळात चंद्रहार पाटलांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच असेल, अशी भूमिका देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर कली आहे. सांगलीतील मिरज येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पैलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या सेनाप्रवेशाचे संकेत दिले आहेत.
आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता, अशा शब्दात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागवला आहे. शिवसेनेत रोज शेकडो-हजारो कार्यकर्ते आणिनेते प्रवेश करत आहेत, कारण इथे कार्यकर्ते थेट नेत्याला भेटू शकतो, इथे कार्यकर्त्याला वाव आहे, असा खोचक टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.