समानतेबरोबरच स्त्री -पुरुष सहचार्य महत्वाचे : स्नेहलता नरवणे-श्रीकर

कोल्हापूर : आजच्या काळात स्त्रिया उद्योग, व्यवसायासह विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे हे निश्चितच आनंददायी आहे. मात्र केवळ स्त्री- पुरुष समानता असून चालणार नाही तर या दोघांमध्ये सहचार्य असणेही तेवढेच गरजेचे आहे. पुरुष आणि समाजाची चागली साथ मिळाल्यास महिलांच्या प्रगतीचा आलेख आणखीनच उंचावेल असा विश्वास कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे-श्रीकर यांनी व्यक्त केला.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा लिंग संवेदनशीलता आणि महिला विकास कक्ष आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आयक्यूएसी विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर "स्त्री प्रीन्युअर्स कॉन्क्लेव्ह" चे आयोजन करण्यात आले होते. महिला उद्योजकांना सन्मानित करून आणि त्यांना प्रेरणा देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख अतिधी म्हणून नरवणे-श्रीकर बोलत होत्या.
यावेळी कलापौरी डॉट कॉमच्या सह-संस्थापक अपर्णा चव्हाण, ‘सिरी’च्या सह-संस्थापक आणि 'इंडिया यूएई स्टार्टअप ब्रिज'च्या भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी अंजोरी परांडेकर, स्टुडिओक्युलस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि प्रमुख आर्किटेक्ट अभियंता जानकी वैद्य, स्मार्ट महिला संस्थापक मनाली स्मार्ट, रेडीओ मिर्चीच्या प्रोग्रामिंग हेड आरजे अनया, प्राइम फॅशन इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य स्नेहल पाटील, कोअर अँड मोर फिटनेस स्टुडिओच्या सिद्धी इंगळे या प्रेरणादायी महिलांना उद्योजकतेतील त्यांचे प्रवास, अंतर्दृष्टी आणि अनुभव कथन करत मुलीनी उद्योग व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आयक्यूएसी संचालिका डॉ. शिंपा, प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे, डॉ. उमारणी जे. यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली दिवटे यांनी केले तर आभार समृद्धी पाटील यांनी मानले.