सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत भाजपा शिष्टमंडळाची पहाणी; आरोग्य अधिकारी धारेवर
कोल्हापूर / प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना संजीवनी असणारे रुग्णालय म्हणून सावित्रीबाई फुले रुग्णालय ओळखले जाते. शहरा बरोबर ग्रामीण भागातून जवळपास 200 ते 300 रुग्ण दररोज या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.
परंतु महानगरपालिकेच्या सरकारी काम या धोरणामुळे सध्या या रुग्णालयाची इमारत आणि आरोग्य सुविधाच आजारी पडली आहे.
आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले रूग्णालयाला भेट देऊन संपूर्ण रूग्णालयाचा आढावा घेतला.
भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसणे, रुग्णालयात असणारी अस्वच्छता, प्रसूती व बालरोग विभागातील भिंतीवर पावसाचे पाणी जिरपणे अशा अनेक गंभीर गोष्टी निदर्शनास आल्या.
यावर भाजपा शिष्टमंडळाने महापालिकेच्या व रूग्णालयाच्या संबंधीत अधिकार्यांना अपुऱ्या सोयीसुविधा, जिर्ण झालेल्या इमारती संदर्भात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, हर्षदीप घाटगे यांच्याशी सविस्तर चर्चा करत प्रश्नांचा भडिमार केला.
याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव यांनी, सावित्रीबाई फुले रूग्णालयाच्या असंख्य अडचणीवर मात करण्यासाठी आणि नवीन इमारत उभारणीसाठी पाठपुरावा करण्यासाठी, असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भा.ज.पा. मार्फत पाठपुरावा करण्याचा निर्धार केल्याचे सांगत, प्रशासनाने फक्त
बघ्याची भूमिका घेतल्यास तीव्र करण्याचा इशारा दिला. शिवाय रूग्णालय हि जागा आंदोलनाची नाही हे हि अधिकार्यांनी ध्यानात ठेवावं अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा सुद्धा महेश जाधव यांनी दिला.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यात कोणतीही हेळसांड होता कामा नये असा गर्भित इशारा दिला. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले रुग्णालयाची नवीन प्रस्तावित इमारत याच आहे त्याच ठिकाणी बांधण्यात यावे अशी मागणी केली.
प्र.का.सदस्य राहूल चिकोडे यांनी संपूर्ण औषधे वेळेवर उपलब्ध करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करावा यामध्ये कोणत्याही मदत लागल्यास भारतीय जनता पार्टीशी संपर्क साधावा असे सांगितले.
नेशन फस्ट चे अवधूत भाट्ये यांनी याठिकाणी नवीन इमारत का गरजेची आहे हे पटवून सांगत याच गोष्टीसाठी गेल्या 5 वर्षांपासून पाठवपुराव करत असल्याचे नमूद केले.
बैठकीअंती सुचवण्यात आलेल्या गोष्टी किती दिवसांत कागदावर होणार याचे लेखी म्हणणे दोन दिवसांत देण्याचे व याच ठिकाणी नवीन इमारतीसाठी शासनाला प्रस्ताव देण्याचे ठरले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, नेशन फर्स्टचे अवधूत भाटे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, बंडा साळुंखे, संजय सावंत, राजू मोरे, संतोष भिवटे, विजय अग्रवाल, विजय खाडे, गायत्री राऊत, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, शैलेश नाळे, दिनेश पसारे, अमर साठे, नजीम आत्तार, दिनेश पसारे, महेश यादव, योगेश साळुंखे, अभिजीत शिंदे, ओंकार घाटगे, आसावरी जुगदार, शुभांगी चीतारे, सुनीता सूर्यवंशी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.