हिंदीसक्तीवर राज ठाकरेंचा प्रखर विरोध मात्र, शरद पवार नेमंक काय म्हणाले .. ?

हिंदीसक्तीवर राज ठाकरेंचा प्रखर विरोध मात्र, शरद पवार नेमंक काय म्हणाले .. ?

बारामती - राज्य सरकारने पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या पर्यायात हिंदी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी इतर राजकीय पक्षांनाही या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र यावर संयमित भूमिका घेतली आहे. बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले, "हिंदी भाषा लादू नये, पण तिचा द्वेष करणंही योग्य नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाने निर्णय घ्यावा, अशी व्यवस्था असावी."

पवार पुढे म्हणाले, "देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे संवादासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र, सक्तीने हिंदी शिकवणं योग्य ठरणार नाही."

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावर शरद पवार म्हणाले, "सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका आता लांबवता येणार नाहीत. साधारणपणे तीन महिन्यांत प्रक्रिया सुरू होईल. महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेकाप आणि इतर लहान पक्ष एकत्र बसून निवडणुका लढवण्यावर चर्चा होईल. आमची इच्छा आहे की निवडणूक एकत्र लढवावी."

मुंबई महापालिका निवडणुकीविषयी त्यांनी स्पष्ट केलं की, "मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे मुंबईसंदर्भात निर्णय घेताना त्यांचा विचार करावा लागेल."