स्वाभिमानी जनतेने निवडणूक हातात घेतल्याने परिवर्तन अटळ :समरजितसिंह घाटगे

स्वाभिमानी जनतेने निवडणूक हातात घेतल्याने परिवर्तन अटळ :समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) :  होऊ घातलेली विधानसभा निवडणुक ही राजे समरजितसिंह घाटगे विरूद्ध हसन मुश्रीफ अशी नाहीच आहे.मुळात ही निवडणूक गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कागल तालुक्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आहे.तालुक्यात सुरू असलेली झुंडशाही आणि एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी स्वाभिमानी जनतेनेच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे.त्यामुळे परिवर्तन अटळ आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार )नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

            येथील मगर हॉल येथे श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या माजी कर्मचारी तसेच जेष्ठ कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांचा सत्कार सरसाबाई विठ्ठल कांबळे ( लिंगणूर दु.) तर राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार जयजयराम कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

         घाटगे पुढे म्हणाले, तालुक्यात स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे आणि स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी राजकारण आणि समाजकारणात निष्ठावंत माणसं निर्माण केली. त्यामुळे गुरू निष्ठा काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे.कोणताही गट-तट,जात-पात न पहाता त्यांनी केवळ माणसं उभारण्याचे काम केले.आम्ही देखील आज त्यांचे हे संस्कार आणि विचार नेटाने पुढे नेत आहोत.यासाठी आपल्या सर्वांचा आशिर्वाद हवा असून आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या

           शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सामान्य माणसांना स्वावलंबी बनविण्यासाठी आपली हयात व्यतीत केली.त्यांच्या या दातृत्वाची जाणीव ठेवून तालुक्यातील स्त्री शक्ती परिवर्तन घडवून आणतील असा विश्वास व्यक्त केला.

       यावेळी दत्ता चव्हाण कृष्णा पाटील (कणेरी), संजय भगवे (कागल) ,मोहन जोशी (कागल), बापुसो मोहीते (कागल),भगवान गुरव( मुरगूड), महादेव कांबळे ( व्हन्नाळी )यांनी मनोगत व्यक्त केले.

         यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, माजी नगराध्यक्ष रमेश माळी,तुकाराम आवटे,विजय बोंगाळे, दत्तामामा खराडे, अनंत फर्नांडिस,राघू हजारे,हिराप्पा बोराटे, धोंडीराम पाटील, अभिजित पाटील,वसंत पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक, कार्यकर्ते,महिला, कर्मचारी,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                स्वागत-प्रास्ताविक शाहू साखर कामगार संघाचे माजी सचिव बाळासो तिवारी यांनी केले. आभार संभाजी चौगले यांनी मानले.

   *गल्लीबोळात केवळ राजेंच्या नावाची चर्चा........* 

    

      यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्ता चव्हाण (तमनाकवाडा) आणि शंकर मेथे (शेंडुर) म्हणाले,गेली पंचवीस वर्षे ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मायबाप जनतेने दिली त्या नेतृत्वाकडून जनतेचा सर्वच पातळ्यांवर पूर्णपणे अपेक्षाभंग झालेला आहे.केवळ कंत्राटदारांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नव्हे.आजही तालुक्यातील रूग्णांना मोठ्या उपचारांसाठी पुणे-मुंबई येथे जावे लागते.खरंच ही या तालुक्याची शोकांतिका आहे. त्यामुळे आता बदल करायचाच हे जनतेनेच ठरवले आहे.गल्लीबोळात आणि कोपऱ्या- कोपऱ्यांवर केवळ आणि केवळ राजे समरजितसिंह घाटगे यांनाच निवडून आणण्याची चर्चा जोर धरू लागली आहे असे सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनीच टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला भरभरून प्रतिसाद दिला.