Fawad Khan Movie : "पहलगाम हल्ल्यानंतर फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट भारतात बॅन"; युट्यूबवरुन गाणीही हटवली

मुंबई : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा बहुचर्चित चित्रपट ‘अबीर गुलाल’ भारतात मोठ्या वादात अडकला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे देशभरात संताप उसळला आहे, आणि त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनावर झाला आहे.
भारत सरकारने परिस्थितीचा विचार करता चित्रपटाचे भारतातील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी पुष्टी केली की, “फवाद खान अभिनीत चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.”
प्रमोशनल गाणी हटवण्यात आली
‘अबीर गुलाल’ चित्रपटासाठी यापूर्वी ‘खुदाया इश्क’ आणि ‘अंग्रेजी रंगरासिया’ ही दोन गाणी युट्यूब आणि सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली होती. या गाण्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता दोन्ही गाणी भारताच्या युट्यूबवरून हटवण्यात आली आहेत.
फवाद खान व वाणी कपूरने हल्ल्याचा निषेध
चित्रपटावर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, फवाद खान आणि वाणी कपूर दोघांनीही सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. फवादने लिहिलं, "या भीषण हल्ल्याची बातमी ऐकून मन हेलावून गेलं. मृतांच्या कुटुंबियांना या दुःखात ताकद मिळो."
वाणी कपूरनेही हल्ल्यावर दुःख आणि संताप व्यक्त केला. रिद्धी डोगरा, जी या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहे, तिने देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त केला, मात्र तिच्या पाकिस्तानी सहकलाकारासोबत काम केल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.
रिद्धीने त्याला उत्तर देताना म्हटलं की, “कलाकाराची ओळख त्याच्या देशापेक्षा मोठी असते. मी दहशतवादाचा नेहमी निषेध करीन, पण कलाकार म्हणून मी कोणताही भेद मानत नाही.”