Goa News : लैराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी ;७ जणांचा मृत्यू , ३० जखमी

पणजी: गोव्यातील शिरगाव येथे पार पडत असलेल्या प्रसिद्ध लैराई देवीच्या यात्रेत शुक्रवारी रात्री उशिरा भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ३ वाजता घडल्याची माहिती मिळते आहे.
प्राथमिक माहितीनुसार, यात्रेदरम्यान आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर गर्दीत असलेल्या लोकांनी घाबरून पळण्यास सुरुवात केली. परिणामी, मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होऊन चेंगराचेंगरी झाली. प्रशासनाकडून नियोजनात काही त्रुटी झाल्याची माहितीही समोर येत आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत जखमींच्या भेटीला
जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती
लैराई देवी यात्रा गोव्यातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. या यात्रेमध्ये हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि अंगारांवर चालण्याचा विधी पाहण्यासाठी उपस्थित राहतात. दरवर्षी गोवा आणि परराज्यांमधून तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेला येतात.