Nashik Crime : मित्रानेच मित्राचा केला खून, मुलीचा वाढदिवस राहूनच गेला

नाशिकरोड: नाशिकरोडच्या जुना सायखेडा रोडवरील बालाजीनगर भागात गुरुवारी रात्री सव्वादहा वाजता तडीपार गुंडांमध्ये चाकू व लोखंडी रॉडसह हाणामारी झाली. यामध्ये हितेश सुभाष डोईफोडे (रा. संजय गांधीनगर) याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र रोहित नंदकिशोर बंग (२८) गंभीर जखमी झाला.
संशयित नीलेश पेखळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी ही घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी दुचाकी उभी करण्यावरून वाद झाल्यानंतर पेखळेने गेटला अडकवलेल्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून हितेशवर डोक्यात वार केला. रोहितवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. हितेशने जीव वाचवण्यासाठी पळ काढला, पण संशयितांनी पाठलाग करून त्याचा निर्घृण खून केला.
गंभीर जखमी रोहितने एका अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून भावाला संपर्क केला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आश्चर्य म्हणजे, गंभीर जखमी हितेशला संशयित नीलेश पेखळेनेच जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी काही तासांत पेखळेला अटक केली असून, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलीचा वाढदिवस गेला राहून
मृत हितेशच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला होता. त्यासाठी तो मित्रांना आमंत्रण देत होता. गुरुवारी रात्रीही हितेश हा मित्र रोहितला सोबत घेऊन एकलहरे येथे एकास आमंत्रण देण्यासाठी निघाला होता. जेलरोडला गेल्यावर हितेशने अचानक संशयित नीलेशचे घर गाठले. येथे नीलेशने साथीदारांच्या मदतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हितेशचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे राहून गेले.