Mushtak Ali T20 : शिवम दुबे, सूर्यकुमार यादव मुंबई संघात परतणार
माझा महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचं सय्यद मुश्ताक अली टी- 20 स्पर्धेतलं आव्हान सध्या डळमळीत आहे. परंतु दोन सामन्यांसाठी भारताचे स्टार खेळाडू शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव संघात परतणार आहेत. मुंबईचे अजूनही तीन सामने बाकी आहेत. 3 डिसेंबर रोजी सेवा दलाशी तर 6 डिसेंबरला आंध्र प्रदेश विरुद्ध सामना रंगणार आहे.
मुंबईचा डावखुरा फलंदाज शिवम दुबे सप्टेंबर महिन्यापासून पाठदुखीच्या त्रासामुळे संघात खेळू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय मालिकांनाही तो या कालावधीत मुकला होता. पण आता तो दुखापतीतून बाहेर पडला असून हैदराबाद मध्ये असलेल्या संघात तो सहभागी होणार आहे. तर सूर्यकुमार यादवच्या सख्ख्या बहिणीचं लग्न असल्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. स्टार खेळाडू शिवम दुबे साठी हे सामने खेळणे म्हणजे महत्त्वाची संधी असणार आहे. कारण टी-20 संघात मधल्या फळीत खेळण्यासाठी मोठी चुरस आहे, क्रिकेट स्पर्धेत खेळून तो चांगली कामगिरी करून भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नईने बारा कोटी रुपये देऊन शिवम दुबेला कायम ठेवले
अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जने शिवम दुबेला बारा कोटी रुपये किंमत मोजून आपल्याकडेच कायम ठेवलं आहे. मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक स्पर्धेत तीन सामने खेळला आहे. यातील दोन सामने मुंबईने जिंकले आहेत,तर एक सामना मुंबईला गमवावा लागलाय. मुंबई 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईने नागालँड चा पराभव केला आहे. मुंबईचे आता दोन साखळी सामने बाकी आहेत.