अखेर मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली माघार; बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत झाला 'हा' निर्णय

अखेर मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली माघार; बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत झाला 'हा' निर्णय

सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी घेतलेले हा निर्णय आता मागे घेतला आहे. प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतली. पोलिसांसोबत उत्तमराव जानकर  यांची बैठक झाली.  या बैठकीत चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांशीही चर्चा करून त्यांनी हा निर्णय जाहीर केला.  

पोलिसांकडून दबाव, काय म्हणाले उत्तमराव जानकर ?

पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत पोलिसांनी सांगितले की,.एकही मतदान केलंत, तर तुमचं सगळं साहित्य, त्या मतपत्रिका असतील किंवा मतपेट्या असतील, सगळं आम्ही गुंडाळून घेऊन जाऊ.  तुमच्या सर्वांवर गुन्हे दाखल करणार आहोत, आधीच आम्ही कलम १४४ लागू केलं आहे, असं पोलिसांनी सांगितल्याचं उत्तम जानकर म्हणाले.

का घेतली माघार?  

गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर मतदानच करु देणार नसतील, आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील, जी मतदानाची प्रक्रिया आहे. किमान १५०० मतदान झाल्याशिवाय निकाल येऊ शकत नाही. ते १५०० मतदान मला होणार होतं, पण प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा जानकर यांनी केली.

येत्या आठ दिवसात प्रांत कार्यालयात चर्चा करुन किंवा योग्य ठिकाणी ताकदीने न्याय मागू. तालुक्यातील २५ ते ५० हजार लोकांचा आक्रोश निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवू, न्याय मिळाल्याशिवाय उत्तमराव जानकर थांबणार नाही, असा इशाराही उत्तमराव जानकर यांनी दिला.