Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा धसका, भारताचा आक्रमक पवित्रा; पाकिस्तानच्या पोकळ धमक्या

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शेती, जलविद्युत उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवले, तर हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणीची तयारी केली असून नियंत्रण रेषेवर कुरापतीही सुरू आहेत.
भारताचा लष्करी ताकद दाखवत युद्धसराव
याचवेळी भारताने आपली लष्करी ताकद दाखवत उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायू दलाच्या १५ लढाऊ विमानांनी ‘टच अँड गो’ सराव केला. यामध्ये राफेल, मिराज, सुखोई, तेजस आणि C-130J सुपर हर्क्यूलस यांचा समावेश होता. विशेष म्हणजे गंगा एक्सप्रेसवेवर रात्रीच्या वेळीही लँडिंगचा सराव करण्यात आला, जो देशातील पहिल्यांदाच घडला आहे.