Satara News : रामराजे निंबाळकर यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश ; नेमकं प्रकरण काय ?

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी विधान परिषद सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केले आहे.
शनिवारी (उद्या) सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळात हा रामराजे यांना मोठा धक्का मानला जातो. या प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्याकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात समजपत्र देण्यात आले आहे. आज २ मे रोजी घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केल्यानंतर मिळालेल्या कोठडीनंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना ताब्यात घेतले होते. त्याच गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयाने या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
त्याचबरोबर या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे राजकारण पहिल्यापासून ज्यांच्या सभोवती फिरत होते अशा विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रभाकर घार्गे यांनादेखील वडूज पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस पाठवल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.